फलटण : फलटण शहरांमध्ये व तालुक्यामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असल्यामुळे रविवारचा आठवडा बाजार बंद राहणार आहे. फलटण शहरातील व्यवसायिक व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण शहराच्या आसपास व शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दक्षता म्हणून रविवार, दि. २१ पासून होणारा प्रत्येक आठवड्यातील रविवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद राहील. शेतकरी व फळभाजी विक्रेते यांनी यांची नोंद घ्यावी.
तसेच फलटण शहरातील व्यावसायिक व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणी घेतल्याशिवाय दुकाने उघडल्यास त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल तरी फलटण शहरातील सर्व व्यावसायिक, फळभाजी विक्रेते तसेच रिक्षाचालक व व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी शंकर मार्केट येथील शाळा नंबर एक येथे असणाऱ्या नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विनामोबदला करून घेण्याबाबत सोय उपलब्ध करून दिली आहे. ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.