फलटण : सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. आगामी काही दिवसांमध्ये फलटण तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या कोविड केअर सेंटरचे रूपांतर हे जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील ‘लक्ष्मी-विलास पॅलेस’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहे आम्ही पण सतर्क आहोत. आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट ही तीव्र स्वरूपाची येऊ शकते, असा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा व्हायरस हा म्यूटेट होऊन तिसरी लाट ही तीव्र स्वरूपाची असेल असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी उपचार मिळावेत म्हणूनच आपल्या सर्वांचे प्रयत्न असणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी सर्व उपचार यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या सुरू आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनासुद्धा धोका सांगितला आहे, म्हणूनच लहानमुलांसाठीसुद्धा फलटण येथे स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय व लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागामधील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी नुकतेच फलटण तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार हे तालुक्याच्याच ठिकाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
चौकट
सातारा जिल्ह्यात लसीकरणाला वेग यावा,लसी मुबलक मिळाव्यात, औषधे मिळावीत यासाठी आपण लक्ष घातले असून पुढील आठवड्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत बोलावून सूचना देणार असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.