फलटण : महानुभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या फलटण येथे सोमवारपासून सुरू होणारी घोड्याची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेचा मुख्य दिवस रविवार, दि. १ रोजी आहे.
महानुभाव पंथाची दक्षिण काशी समजली जाणारी घोड्याची यात्रा प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. यात्रा दरवर्षी पाच दिवस चालते. रोज संध्याकाळी रात्री आठ वाजता श्री कृष्ण मंदिर येथून छबीना निघून श्री आबासाहेब मंदिर येथे रात्री अकरा वाजता येतो. आरती होऊन समाप्त होतो. यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी एक वाजता श्री आबासाहेब मंदिर येथून छबीना निघून शहर प्रदक्षिणा करून रात्री आठ वाजता मंदिरामध्ये येतो. आरती होऊन समाप्त होतो.
कोरोनामुळे ही यात्रा गेल्या वर्षीही रद्द करण्यात आली होती ती यंदाही रद्द होत आहे. भक्तांनी या महामारीमधून भारत देशासह सर्व जगाला मुक्त करावे, अशी प्रार्थना घरातूनच श्री चक्रधर स्वामी भगवान श्रीकृष्णाकडे करावी की, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.