कऱ्हाड : ‘सहजता, साधेपणा, सोपेपणा यातून उलगडत जाणारे जीवनाचे वास्तवदर्शी तत्त्वज्ञान म्हणजे तारुण्यभान होय,’ असे मत समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले. येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘तारुण्यभान’ शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. ए. बी. जगदाळे होते. यावेळी डॉ. सविता मोहिते, प्रा. शोभना रैनाक, प्रा. माधुरी कांबळे, डॉ. वर्षा देशपांडे, आर्किटेक्चर सारंग बेलापुरे, प्रा. डी. के. खोत उपस्थित होते. डॉ. बंग म्हणाल्या, ‘जग काय म्हणेल, हा विचार न करता खरं सांगण्याचं धाडस माणसाने करावे. तरुणाईत तरुणांची गोंधळलेली अवस्था असल्याने समज-गैरसमज निर्माण होतात. यासाठी प्रत्येक पालकांनी त्यांच्याशी बोलले पाहिजे. त्यांच्या मनातील प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे दिली पाहिजेत. स्त्री-पुरुष समानतेच्या नुसत्या गप्पा न मारता ते प्रत्यक्षात जर अंमलात आणाले, तर समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होतील. त्यासाठी पालक व पाल्य यांची समन्वयाची गरज आहे.’प्रा. डॉ. नंदिनी रणखांबे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. पाहुण्यांचा डॉ. सविता मोहिते यांनी परिचय करून दिला. डॉ. रेश्मा दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्वरी बेलापुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणजे तारुण्यभान
By admin | Published: July 31, 2015 9:23 PM