रामराजेंच्या विरोधात बातमी; पत्रकाराला धमकीफलटण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शनिवारी दिवसभर फलटणमध्ये राजकीय घमासान झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फै री झडल्या. फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर रंगला. काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट रामराजेंवर हल्लाबोल चढविला तर केवळ मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप रामराजेंनी केला.‘स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या गुंडांकडून राष्ट्रवादीचे सुशांत निंबाळकर यांच्यावर केलेला हल्ला व पत्रकार संग्राम निकाळजेंना दिलेली धमकी निषेधार्ह व लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. या हल्ल्यामुळे रामराजेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असा आरोप स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यावर निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रणजितसिंहानी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी नगरसेवक अनुप शहा, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव फडतरे, कार्याध्यक्ष अनिल तावरे, अशोकराव भोसले उपस्थित होते.फलटण तालुक्यात एक हाती सत्ता मिळवूनही रामराजेंना कोणतीच कामे करता आलेली नाहीत. तालुक्यात प्रचंड गुंडागिरी वाढली असून, सत्ता व दादागिरीच्या जोरावर त्यांची हुकूमत चालली आहे. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळात अनेक गुंड असल्याचा आरोपही रणजितसिंहानी केला.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला व राजेगटाला जनतेने हिसका दाखविल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या राजकारणी व विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर गुंडाकरवी हल्ले करून दहशत माजविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था यामुळे रसातळाला गेली असून, यामुळे जर त्यांनी गुंडागिरी सुरूच ठेवली तर जशास तसे त्यांना उत्तर देऊ, असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.अॅड. नरसिंह निकम व अनुप शहा यांनी यावेळी राजेगटावर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, यानंतर सर्वांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, राजेगटाच्या दबावापोटी आपण सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी फिर्याद घेतलेली नाही. फिर्याद देऊनही मानसिक त्रास दिला गेला. जखमी अवस्थेत एक तास पोलीस ठाण्यात बसल्यानंतर फिर्याद घेतली गेल्याचा आरोप सुशांत निंबाळकर यांनी केला. फलटण शहरात शनिवारी दिवसभर या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण प्रचंड गरम बनले होते. चौकाचौकांत थांबलेल्या जमावात हीच चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)
फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर!
By admin | Published: July 06, 2014 12:30 AM