प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुळव्याध या आजाराविषयी समाजात असलेल्या संकोचामुळे याबाबत बोलणं किंवा औषधोपचार टाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पाईल्स आहे, असे समजून घरगुती उपाय करणाºया काही रुग्णांना कर्करोग असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. मुळव्याध आणि कर्करोग यांच्या लक्षणात साम्य असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.बदलती जीवनशैली, तंतुमय पदार्थांचा आहारातील अल्प समावेश आणि जंक फूडमुळे कोलमडलेली पचनक्रिया या सर्व बाबी मुळव्याधीला आमंत्रण देणाºया आहेत. त्यामुळे पोट साफ झाले नाही तर मुळव्याधाचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र, शंभरातील अवघ्या १० टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो आणि उर्वरित रुग्णांना केवळ आहार, व्यायाम आणि पोट साफसाठी काही औषधे देऊन मुळव्याधावर उपाय करता येत असल्याचे अनेकांना माहितीच नाही.मुळव्याधीचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. मात्र याविषयी खुलेपणाने कोणाशीच काहीच न बोलण्याची त्यांची मानसिकता असते. त्यामुळे घरगुती औषधे आणि उपाय करून महिला अगदी शेवटच्या क्षणाला याच्या निदानासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जातात. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले असल्यामुळे महिलांना अशक्तपणा, रक्त पडून अॅनिमिया, रक्तक्षय आदी आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.पूर्वी पौष्टिक अन्नाच्या अभावामुळे महिलांमध्ये अॅनेमिया होण्याची संख्या जास्त होती. आता पुरेसा आणि पोषक आहार मिळूनही महिलांमध्ये अॅनेमिया होण्याचे मुळव्याध हे एक कारण बनू पाहत आहे. वारंवार रक्त पडल्यामुळे काही महिलांमध्ये रक्तक्षयची लक्षणेही वाढीव दिसू लागली आहेत. शरीरातील रक्त कमी होत असल्यामुळे महिलांमध्ये हे आजारही आढळत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. मुळव्याधाचा आजाराविषयी समाजात अजूनही संकोच आहे. याचे खास दवाखाने आणि वैद्यकीय तज्ज्ञ आहेत, हेच अनेक सामान्यांना माहिती नाही. त्यामुळे विना शस्त्रक्रिया मुळव्याध बरा करून देतो, असे सांगून गच्चम फी आकारणारे अशिक्षित वैद्य ग्रामीण भागात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे रुग्ण आणल्यानंतर त्यांना कमिशन देणारे महाभागही या भागात पाहायला मिळतात.या आजाराच्या बाजारीकरणाविषयी बोलताना नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर भोंदूचे एजंट म्हणाले, ‘मुळव्याधग्रस्त रुग्णांना विनाशस्त्रक्रिया आजार बरा करण्याचे आमिष भोंदू वैद्यकीय बुवांच्या एजंटांकडून दाखवतात. त्यामुळे रुग्ण त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. आपल्याला होणारा त्रास आणि त्यात शस्त्रक्रिया हे व्याप नको म्हणून सर्वसामान्य रुग्ण नातेवाइकांसह शस्त्रक्रियेला पोहोचतातही. तिथे गेल्यानंतर रक्ताचा एक थेंबही न पाडता आणि वेदनाविरहित पद्धतीने ‘कोंब’ काढल्याचे डॉक्टर सांगतात. काही उत्साही नातेवाईक ‘कोंब’ दाखवा, असेही म्हणतात. कोणत्याही मांसाचा एक छोटासा तुकडा दाखवून हे भोंदू रुग्णासह नातेवाइकांना फसवतात. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे एका एजंटाला सरासरी पाच ते सात हजार रुपयांचे कमिशन मिळते.’ साताºयात गेल्या दहा वर्षांत मुळव्याध झालेल्या रुग्णांचा संकोच दूर झाल्यामुळे उपचारासाठी येणाºयांची संख्या वाढली आहे. मध्यमवयीन पुरुष, ज्येष्ठ आणि महिला रुग्णांची संख्या मोठी आहे. महिन्याला हजार रुग्ण तपासल्यानंतर त्यातील ३० ते ४० रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात येते.महिन्याला ४ ते ५ कॅन्सर रुग्णांची भर...मुळव्याध हा बरा होणार आजार आहे, त्यामुळे हा त्रास होणारे रुग्ण गरम पाण्यात तूप टाकून पिणे, सब्जा, दही, ताक यासारख्या शीत पदार्थांचा आहारात समावेश करण्याकडे भर देतात. हे उपाय करूनही उपयोग झाला नाही तर मेडिकलमधून मिळणाºया औषधांचा आधार घेतात. त्यातूनही बरं नाही वाटलं तर मग वैद्यकीय सल्ला घेण्यात येतो. मात्र, मुळव्याध झाले असे समजून स्वत:च्या शरीरावर प्रयोग करून घेत असताना रुग्ण सुप्तपणे कर्करोग वाढवत असतात, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. सर्व प्रयोग केल्यानंतर रुग्ण जेव्हा मुळव्याध विकार तज्ज्ञांकडे पोहोचतो तेव्हा उशीर झालेला असतो. दर महिन्याला एका दवाखान्यातून सरासरी ४ ते ५ रुग्णांमध्ये कर्करोग आढळतो.
‘पाईल्स’आडून ‘कॅन्सर’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:58 PM