कोळकी : पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा पिलर खचला असून, मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा गेला असून, हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. यामुळे या कालव्यावरील बांधण्यात अनेक पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहे.
पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पूल सन १९१८ साली बांधला असल्याचे दगडावर टाकलेल्या सालावरून दिसून येत आहे. पुलास शंभर वर्षे होऊन गेले आहे. पुलाचे दगडी बांधकाम चुनखडीत बांधले आहे. नीरा उजवा कालवा बारा महिने पूर्ण क्षमतेने वाहत असतो. शिवाय पाण्याचा प्रवाह वेग खूप असतो. त्यामुळे या पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.
जीर्ण पुलावर धोक्याची शक्यता...
- पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या भागात उसाचे क्षेत्र भरपूर असून, सध्या साखर कारखानाचे गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यास उसाची वाहतूक, ट्रँकर, बैलगाडी ट्रक या अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून सध्या सुरू आहे.- त्यामुळे पण मोठी दुर्घटना घडू शकते. नीरा उजवा कालवा ब्रिटिशकालीन बांधकाम असून, यास शंभर वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. कालव्यावरील सर्वच पूल कालबाह्य झाले आहेत. या कालव्यामधील मोऱ्यांचे काम सध्या सुरू आहे.- या पद्धतीने पुलाचेदेखील काम करण्यात यावे, असे टाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच राहुल इवरे यांनी पाटबंधारे विभागास पत्राद्वारे कळविले आहे.