दहिवडी : दहिवडी येथील मध्यवर्ती ठिकाणच्या शासकीय जागेत हरित वसुंधरा माण-खटावअंतर्गत लोकसहभागातून सुसज्ज असा पायलट प्रकल्प उभा राहत असून फिरण्यासाठी रनिंग ट्रॅक, नाना-नानी पार्क, खेळाचे मैदान, ऑक्सिजन पार्क यासारख्या सुविधा सुरू करण्यासाठी तब्बल १० एकरच्या जागेत सुरू असलेल्या कामात हजारो हात मदतीसाठी धावले आहेत. २० हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.
या शासकीय जागेत प्रांत कार्यालय, पोलीस वसाहत, बांधकाम विभाग, सामाजिक वनीकरण यांची जागा आहे. हा परिसर १० एकरांपेक्षा जास्त आहे. प्रांत कार्यालय सोडून इतर जागा पूर्ण झाडाझुडपांनी वेढल्या होत्या. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी हा परिसर स्वच्छ व्हावा यासाठी दहिवडी शहरातील सामाजिक भान असणाऱ्या लोकांना कल्पना दिली. दहिवडी नगरपंचायत, डॉक्टर, मेडिकल, पाणी फाउंडेशन टीम, अकॅडमी, पतसंस्था व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींना सहभागी करून प्रशासन व लोकसहभाग यांनी एकत्र येऊन दहिवडीसाठी आयडाॅल प्रकल्प बनवण्याचे ठरले. सुरुवातीला सर्व झाडेझुडपे हटवली. संपूर्ण परिसर स्वच्छ केला. जागा निश्चित केली. भविष्यात होणाऱ्या शासकीय इमारतीच्या जागेला अडथळा न आणता या परिसराचा वापर करायचा यासाठी आराखडा निश्चित करण्यात आला. या प्रकल्पाला लोकवर्गणीही जमा होऊ लागली आहे. या संपूर्ण परिसरात वीज, पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आली आहे.
डॉ. प्रदीपकुमार पालवे, नंदकुमार खोत, सुनील पोळ, संदीप खाडे यांच्याकडे जबाबदारी दिली असून अण्णा करंडे, अजित पवार, बलवंत पाटील, डॉक्टर संघटना यांच्यासह अनेक मंडळी जेवढा वेळ देता येईल तेवढा देऊन हातभार लावत आहेत.
(कोट..) माझ्या कार्यालयात दोन वयस्कर आजी-आजोबा कामानिमित्त आले होते आणि कोरोनाचा काळ होता. त्यामुळे जवळ जाणे टाळत होतो अशावेळी ही लोकं कार्यालयाच्या बाहेर दुपारी भरउन्हात जेवत होते. आपल्या कार्यालयापुढे सावली नाही याचे दु:ख वाटले. त्याच दिवशी प्रांत कार्यालय परिसरात झाडे लावण्याचा निर्णय घेतला.
- शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी, माण
कोट..
तालुक्यात सर्वांत मोठे शहर दहिवडी. स्वच्छ हवा, मुलांना खेळायला जागा, लोकांना विरंगुळा म्हणून गार्डन असावे, असे मनोमन वाटायचे. कोरोनात अनेक जीव ऑक्सिजन नसल्यामुळे गेले. शासकीय जागा एवढी मोठी उपलब्ध होतेय म्हटल्यावर दहिवडीकरांनी संधीचे सोने करायचे ठरवले. यासाठी रोज हजारो हात तन-मन-धनाने पुढे येत आहेत.
डॉ. प्रदीपकुमार पालवे, अध्यक्ष, माण-खटाव वसुंधरा.
२३दहिवडी प्रकल्प
फोटो : दहिवडी येथील शासकीय जागेत हरित वसुंधरा माण-खटावअंतर्गत पायलट प्रकल्पचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात झाडाची लागवड सुरू आहे.