ढेबेवाडी : वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मितीसाठी काढलेल्या बोगद्यातील लोखंडी पाईप दाबाने फुटून उद्ध्वस्त झाल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. शंभर मीटर लांबीच्या बोगद्यातील फुटलेली पाईप कटरच्या साह्याने कापून काढण्याचे काम चालू आहे. दरम्यान, वीजनिर्मितीपूर्वीच दर्जाहीन कामाचा ‘उजेड’ पडल्याने धरणग्रस्त संघटनाही आक्रमक झाली आहे. तब्बल अठरा वर्षांपासून रडतखडत चालू असलेल्या पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणप्रकल्पाचा प्रवास अजून किती दिवस चालणार? असा प्रश्न धरणग्रस्तांसह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. धरणाच्या पाण्याचा लाभ मिळणाऱ्या कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील ४६ गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या चार एकरापेक्षा जास्त असणाऱ्या जमिनी धरणग्रस्तांना देऊ केल्या. उर्वरित जमिनीला पाणी मिळेल, या अपेक्षेने लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा होणाऱ्या या धरणावर दोन मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प साकारण्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ध्येय आहे. धरणाच्या कामाबरोबरच येथे सुमारे शंभर मीटर लांबीचा बोगदाही तयार करण्यात आला आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी गेट बसवून बोगद्यात सुमारे वीस फूट व्यासाची लोखंडी पाईप टाकण्यात आली होती. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी येथील धरणग्रस्तांचा विरोध झुगारून प्रकल्पाची घळभरणी करून पाणीसाठा करण्यात आला. यावेळी पाणीपातळी झपाट्याने वाढून काही गावांत पाणी शिरले म्हणून घाई गडबडीत या बोगद्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने लोखंडी पाईप फुटून उद्ध्वस्त झाल्या. (वार्ताहर) पंधरा दिवसांपासून जमा करताहेत पाईपचे तुकडे बोगद्यात पाणी येऊ नये म्हणून धरणातील पाण्याला घातलाय बांध कामगार जीवावर उधार होऊन करताहेत १५० फूट खोलीवर काम या बोगद्यातील पाईपचे काम २०११ मध्ये झाले होते. त्यावेळी धरणग्रस्तांनी कामाला विरोध केला होता. त्यानंतर पावसाच्या तोंडावर काम पूर्ण झाले; पण लगेचच त्या बोगद्यातून पाणी सोडल्याने त्या पाईप उद्ध्वस्त झाल्या तुटलेल्या पाईप बाहेर काढण्याचे काम चालू आहे. मात्र, यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. - आर. वाय. रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, कृष्णा खोरे
पाण्याच्या दाबाने लोखंडी पाईप फुटून उद्ध्वस्त होत असतील, तर या कामाची तपासणी कशी केली? संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल देताना कामाचा दर्जा पाहणे गरजेचे होते. एकूणच याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. - जगन्नाथ विभुते ,धरणग्रस्त नेते.