शिरवळ - मुराद पटेललोणंद -शिरवळ रस्त्यावर पिसाळवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला आहे. कुमार उर्फ पप्पू ज्ञानोबा कांबळे (वय 32, रा.बौध्द आळी ,शिरवळ ता.खंडाळा ) असे जागीच ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. दरम्यान ,संबंधित कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी काहीकाळ आशियाई महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती,
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शिरवळ ता.खंडाळा येथील कुमार कांबळे हा कुंटूंबीय वीर धरणाकडे फिरायला गेल्याने त्यांच्यामागोमाग शिरवळ येथून भादे ता.खंडाळा गावच्या हद्दीतील वीर धरणाकडे दुचाकी (क्रं. एमएच- 11-सीआर-3280) ने फिरायला निघाला होता.यावेळी दुचाकी पिसाळवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत गणपती मंदिराच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या कार (क्रं.एमएच-12-एमएल-899) ने पाठीमागून जोरदार धडक दिली.
हि धडक ऐवढी जोरदार होती की कारच्या धडकेत दुचाकीचालक कुमार कांबळे हा दुचाकीवरुन जोरदार उडत कारवर जोरदार आदळला. यावेळी कारवर आदळल्याने दुचाकीचालक कुमार कांबळे हा गंभीर जखमी झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला कुमार कांबळे याचा आतेभाऊ आदित्य रमेश कांबळे (वय 17, बोपोडी ,पुणे) हा गंभीर जखमी झाला.दरम्यान ,गंभीर जखमी झालेल्या कुमार कांबळे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डाँकटरांनी तपासून मृत घोषित केले.
यावेळी कुमार कांबळे याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सिध्दार्थनगर येथील ग्रामस्थांनी शिरवळ पोलीस स्टेशन व रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कारचालकाला आमच्या ताब्यात दया व कठोरात कठोर कारवाई करा असे म्हणत गर्दी केलेल्या ग्रामस्थांनी गोंधळ घालत शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आशियाई महामार्ग 47 हा काहीकाळ अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी वाई पोलीस उपविभागीय अधिकारी अजित टिके,शिरवळ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विनायक वेताळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक हणुमंत गायकवाड , गिरीश दिघावकर व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी ग्रामस्थांची समजूत काढत महामार्गावरुन बाजूला केले.
यावेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान ,अपघातग्रस्त वाहने ही क्रेनद्वारे शिरवळ पोलीस स्टेशनला आणली असता गर्दीमधील अज्ञाताने कारवर दगडफेक केली. त्यामुळे पोलीस स्टेशन आवारात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. यावेळी पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिका-यांना पाचारण करत कारचालकाची वैदयकीय तपासणी केली.यावेळी तणावाची परिस्थीती निर्माण झाल्याने सातारा येथील दंगा नियंञण पथक (क्यूआरटी) पथक,लोणंद ,खंडाळा,शिरवळ,भुईंज ,वाई येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. राञी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरु होते.