सातारा : पाणंद रस्त्यावरून झालेल्या वादातून वकिलावर एकाने थेट पिस्तूल रोखून ‘आता तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी दिली. ही धक्कादायक घटना कळंबे, ता. सातारा येथे दि. १५ रोजी सकाळी अकरा वाजता घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
संपत सदाशीव इंदलकर, संपत इंदलकर यांची पत्नी, राजेंद्र परशुराम लावंघरे, अनंत परशुराम लावंघरे, सिद्धेश संपत इंदलकर (सर्व रा. कळंबे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय विष्णू इंदलकर (वय ४२, रा. कळंबे, ता. सातारा) हे व्यवसायाने वकील आहेत. दि. १५ रोजी सकाळी राजेंद्र लावंघरे यांनी त्यांना फोन केला. ‘मी पाणंद रस्ता जेसीबीने खोदून बंद करणार आहे. तू जर इथे आलास तर तुझा मुडदा पाडणार,’ अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर वकील विजय इंदलकर हे पाणंद रस्त्याजवळ गेले. त्यावेळी ते जेसीबीला समोर आडवे गेले. वरील संशयितांनी त्यांना दमदाटी करून धक्काबुक्की केली. तर सिद्धेश इंदलकरने काळ्या रंगाचे पिस्तूल वकिलांवर रोखून मी तुला जिवंत सोडत नाही, अशी दमदाटी केली. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या गावकऱ्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. या प्रकारानंतर अॅड. विजय इंदलकर यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. सहायक फाैजदार देशमाने हे अधिक तपास करीत आहेत.