सातारा : पोलिस वसाहतीतील रस्त्याच्या दुर्दशेचा निषेध करत नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शहरातील प्रमुख चौकात ‘खड्डा मंत्री चंद्रकांत पाटील’ असा उल्लेख करणारे फ्लेक्स लावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच या फ्लेक्समुळे रस्त्यावरील खड्डे दूर होणार की नाही माहीत नाही, परंतु संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांच्या पोटात मात्र नक्कीच खड्डा पडला आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये शहर पोलिस ठाणे ते नगरपालिका या रस्त्यावर गेल्या दहा वर्षांपासून खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते अन् पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यासह अनेकांना अपघातही घडला आहे, असा आरोप करत या प्रभागाचे नूतन नगरसेवक आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी नववर्षानिमित्त अनोखे फ्लेक्स लावले. पोवई नाका, नगरपालिका चौक अन् पोलिस वसाहत परिसरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला हे फ्लेक्स झळकताच भाजपचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले. कारण या फ्लेक्सवर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांंच्या फोटोखाली चक्क खड्डा मंत्री अशी पदवी देऊन खंदारे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. भाजपचे सरचिटणीस अन् नूतन नगरसेवक विजय काटवटे यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
‘खड्डा मंत्री’ फ्लेक्समुळे अधिकाऱ्यांच्या पोटात खड्डा...
By admin | Published: January 02, 2017 11:12 PM