मोरांचा वावर वाढला
सातारा : तालुक्यात ठिकठिकाणी नदीकाठच्या शिवारात मोरांचा वावर वाढला आहे. नदीकाठी सकाळी सकाळी मोरांचे आवाज घुमत आहेत. शहरातही महादरे, आंबेदरे, शाहूपुरी या परिसरात असे आवाज येत आहेत.
वाहतूक अस्ताव्यस्त
फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
विद्युत खांबांची दुरवस्था
शिरवळ : येथील मुख्य चौकातील विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहेत. अनेकदा शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्याही घटना घडलेल्या आहेत. याकडे विद्युत कंपनीने लक्ष देऊन त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कणीस विक्रीतून रोजगार
कऱ्हाड : सध्या शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी मक्याच्या कणसाची विक्री केली जात आहे. भाजून तसेच उकडून दहा ते पंधरा रुपयांना एक कणीस विकले जात असून, त्याची खरेदी केली जात आहे. कणीस विक्रीतून विक्रेत्यांना चांगला रोजगार मिळत आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव
वडूज : वडूज तालुका व परिसरातील काही भागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.
वाहतूक कोंडी
पुसेगाव : राज्यातील विविध टोकांहून येणाऱ्या खासगी गाड्या आणि एसटी यांच्या मार्गात अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अरूंद रस्ता आणि त्यात होणारे पार्किंग वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.
वाहतूक नियमन आवश्यक
सातारा : साताऱ्याच्या बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे खण आळीत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून उत्सव काळापर्यंत खणआळीत वाहतूक रोखण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
रस्त्याची दुर्दशा
सातारा : सातारा शहरालगत देगाव फाटा, शिवराज चौक, वाढे फाटा या परिसरात उड्डाणपूल व रस्त्यावरून ओव्हरलोड मातीच्या वाहनांमुळे शेंद्रे परिसरातील रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे.
मार्डी-खुटबाव रस्ता दयनीय
पळशी : माण तालुक्यातील मार्डी-खुटबाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खडी उखडली आहे, तर बऱ्याच ठिकाणी रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही.
रस्त्याकडेला कचरा
कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. खाद्यपदार्थांच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आरोग्याची काळजी घ्या
मलकापूर : सध्या वातावरणात बदल झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. सर्दी, पडसे आदी आजार उद्भवत असून त्यापासून बचाव करून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय.
रस्ता खचल्याने अपघात
तांबवे : घारेवाडी ते येणके मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावरून दुचाकी वाहनचालकांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या एकाबाजूला तीव्र उतार आणि दुसऱ्या बाजूस चढ अशी अवस्था झाली आहे.