सातारा : खेडशिवापूर ते आनेवाडी टोलनाका परिसरातील खड्ड्यांचा मलाही चांगलाच फटका बसलाय. सुरूर फाट्यावर रात्री माझ्याच गाडीचा टायर फुटल्याने आलेला अनुभव खूपच भयानक होता. त्यामुळे याप्रश्नी जिल्हा प्रशासनाच्या मागे लागून तातडीने बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे अभिवचन भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
टोलविरोधी जनता ही चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी शिवेंद्रराजे यांची भेट घेऊन त्यांना महामार्गावरील गंभीर परिस्थितीबाबत निवेदन सादर केले. यावेळी चळवळीचे प्रमुख प्रवर्तक रवींद्र नलवडे, महेश पवार, महेश महामुने, महारूद्र तिकुंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी टोलविरोधी जनताचे प्रमुख कार्यकर्ते यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. सुविधा द्या टोल घ्या, रस्त्यांची डागडुजी नव्हे तर उत्तम रस्ते ही भूमिका विषद केली. यावेळी महामार्गावर ग्रीड टाकून खड्डे मुजविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, ‘महामार्गावरील गैरसोयींचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मूलभूत सुविधांबरोबरच सुरक्षितता देण्यासही ते सक्षम नाहीत. हा विषय केंद्राशी निगडित आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने बैठक बोलावण्याचा प्रयत्न करणार आहे. नॅशनल हायवे अॅथॉरटीकडून येणाºया अधिकाऱ्यांचीही गंमत असते. अशा बैठकींना अधिकाºयांना बोलावले की मी नुकताच जॉईन झालोय, हे साचेबद्ध उत्तर मिळतं. प्रारंभी सनदशीर मार्गाने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. हा प्रयत्न अयशस्वी झाला तर प्रशासनाला निवेदन देऊन एक दिवस टोलमुक्त आंदोलन आखावं लागेल. आर्थिक फटका बसल्यानंतर ही माणसं शहाणी होतील आणि सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतील.’
निवेदन देण्यासाठी चेतन पवार, जहीर बागवान, प्रवीण नलवडे, सलीम खान, शेखर जाधव, निशिकांत मुळे, कुलदीप मोहिते उपस्थित होते.
- गडकरी यांच्या जावयांनाही आलाय असाच अनुभव
टोलविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भेटीप्रसंगी बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘सुरूर फाटा परिसरात खड्ड्यात गाडी गेल्याने टायर फुटला. माझ्याच गाडीच्या शेजारी आणखी एक गाडी अशाच स्थितीत दिसली. चौकशी केल्यानंतर ही गाडी नितीन गडकरी यांच्या जावयांची असल्याची माहिती मिळाली. असुरक्षित महामार्गांचा फटका या रस्त्यावरून जाणाºया प्रत्येकाला बसत आहे. त्यातून सामान्यही सुटत नाही आणि व्हीआयपींनाही सुटी नाही.’