वडूज : ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर कणीस घुसळल्यानंतर तयार होणारा गरमागरम हुरडा, गूळ, लसणाच्या चटणीसोबत चाखत रंगलेल्या गप्पांच्या मैफली, असे चित्र खटाव तालुक्यातील शेत-शिवारात रंगू लागले आहे. शहरातील पाहुणे आणि मित्रमंडळींसाठी हुरडा आणि हावळ्याचा खास बेत आखून शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी हुरडा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. शहराकडील मंडळी वीकेंडला पिझ्झा-बर्गरऐवजी हुरडा पार्टीचा बेत करून ग्रामीण भागातील निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
सध्या रबी ज्वारीचे पीक जोमात आहे. कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होऊन भरू लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ज्वारीच्या ताटावरून कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते. हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते. वाऱ्यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत राहावेत म्हणून शेतातच लहान खड्डा खणून त्यात गोवऱ्या पेटविल्या जातात. जाळ संपल्यानंतर कणसे निखाऱ्यात ठेवण्यात येतात. चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगली खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात. दाण्यांवरील कण्या नीट निघाल्या नाहीत तर घशाला त्रास देतात. यामुळे कणसे रगडण्याची कला हुरडा तयार करण्यात सर्वाधिक महत्त्वाची समजली जाते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील विविध ठिकाणी हुरडा पार्टीची परंपरा असून, अनेकांनी या हुरडा पार्ट्यांना व्यावसायिक स्वरूपही दिल्याचे बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळते.
गेल्या आठ ते दहा वर्षांत अनेक ठिकाणच्या पारंपरिक ज्वारीच्या पट्ट्यात ज्वारी पिकाच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण दरवर्षी घटत चालले आहे. या पीक बदलाचा परिणाम हुरड्याचा ट्रेंड बदलण्यावरही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेणे बंद केले असले तरी हुरड्यापुरती ज्वारी उत्पादन किंवा इतर ठिकाणांहून आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे अनेक कृषी पर्यटन केंद्र परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरड्याचे नियोजन करतात, तर काही ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी स्वत: हुरडा पार्ट्यांचे नियोजन करून या परंपरेला व्यावसायिक स्वरूप देऊ लागले आहेत. हुरड्याबरोबरच हरभऱ्याचा हावळाही भाजून मोठ्या चवीने खाल्ला जात आहे.
(चौकट)
ग्रामीण संस्कृती जोपासण्याचे आव्हान...
हुरडा पार्टीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र जमून गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत गप्पांच्या छान मैफली पूर्वी रंगायच्या. अलीकडे असे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत. आपली ग्रामीण संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने हुरडा पार्ट्यांचे खास प्रयत्न झाले पाहिजेत.
----------------------------
१३खटाव
खटाव तालुक्यातील शेतशिवारात हुरडा आणि हावळ्याच्या अशा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. (शेखर जाधव )