या भेटीवेळी पायऱ्या, रेलिंग, केबिन, शौचालय, पॅगोडासह वाॅचटाॅवरचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती रवींद्र मोरे यांनी दिली. शिवेंद्रसिंहराजेंना साताऱ्यातील पर्यटनस्थळांचे माहितीपुस्तक भेट दिले. श्रीरंग केरेकर, सावळाराम जाधव, शंकर जानकर व सह्याद्री पठार विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतातील एक नंबरचा भांबवली वजराई धबधबा व पुष्पपठार परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याबद्दल तसेच स्थानिकांना कशा प्रकारे पर्यटनाचा फायदा मिळवून द्यायचा याबाबत सखोल चर्चा झाली. स्थानिकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हाॅटेल व्यवसायात त्यांना पैसा उभारण्यासाठी अनेक अडचणी येतात. शासनाने इटरीज उभारण्यास मदत केली पाहिजे. यातून पर्यटनाचा फायदा स्थानिकांना होईल. भांबवली धबधबा व पुष्पपठारावर अनेक पर्यटन पॉइंट असून पुष्पपठार तीन तालुक्यांत पसरले आहे. पर्यटकांना पर्यटन सुविधा देण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत; पण हे उपक्रम ‘डीपीसी’ने दिलेल्या तुटपुंज्या निधीवर अवलंबून आहेत. पर्यटन उपक्रम राबविताना नियोजन, आर्थिक पाठबळ पाहिजे. लवकरच भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन त्यांना प्रस्ताव बनविण्याची विनंती करू, असे आश्वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्याची माहितीही मोरे यांनी दिली.