- सागर गुजर
सातारा : मुलीच्या जन्माचा सोहळा वृक्षलागवड करून साजरा करण्यात जिल्ह्यातील हजारो शेतकरी गुंतले आहेत. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून ‘कन्या वन समृद्धी’ योजनेत तब्बल ५ हजार ६४८ शेतक-यांनी सहभाग घेतला असून, ५६ हजार ४८० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. सातारा तालुक्यातील ६२७, क-हाडमधील २८९, पाटणमधील १६५, जावळीतील ३९०, कोरेगावातील ६४०, वाईमधील ७९६, येथील १ हजार २१४, खटावमधील ३०१, माण मधील ४६२, फलटण मधील ७६४ अशा एकूण ५ हजार ६४८ शेतकरी कुटुंबांनी या योजनेत सहभागी घेतला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंबाने १० झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली. मुलीच्या जन्मानंतर पहिल्या पावसात खड्डे काढण्यात आले. सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीनिहाय १० रोपे ग्रामपंचायतींना विनामूल्य देण्यात आली. या झाडापासून मिळणा-या सर्व उत्पन्नातून मुलीला कौशल्य विकास व उच्च शिक्षण तसेच रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा पैसा वापरायचा आहे. ज्या शेतक-यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल, त्यांच्याचपुरती ही योजना मर्यादित आहे.
सामाजिक वनीकरणतर्फे मार्गदर्शनशेतकरी घरात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीत नोंद केली जाते. त्याच ठिकाणी वनविभागाचा अर्ज भरून शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान, लागवड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन तसेच झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण जास्त राहावे, यासाठी शेतक-यांना तांत्रिक सल्ला सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येत आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांनी दरवर्षी ३१ मे रोजी वृक्ष जिवंत असल्याच्या प्रमाणाबाबत ग्रामपंचायतीला माहिती द्यायची आहे.