मायणी : पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाचे योग्य संतुलन राखण्यासाठी येथील विनायक दुर्गोत्सव मंडळाकडून स्मशानभूमीची स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले.देशभरात जल्लोषात सुरू असलेल्या दुर्गोत्सवाचा आनंद भाविकभक्त घेत आहेत. या निमित्ताने विविध मंडळाकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मायणी येथील विनायक दुर्गाउत्सव व सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपतांना स्मशानभूमीची स्वच्छता करून याठिकाणी वृक्षारोपणही केले.दरवर्षी विविध सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणारे मंडळ म्हणून मायणी येथील विनायक दुर्गा उत्सव व सांस्कृतिक मंडळ क्रीडा मंडळ नावारूपास येत आहे. मंडळाच्या अठराव्या वर्षानिमित्ताने यंदा मायणी-अनफळे रास्त्यावर असणाऱ्या मुख्य स्मशानभूमीचे सध्याचे रूप वाढलेल्या गवतामुळे अडचणीचे झाले होते.त्यामुळे अंत्यसंस्कारा वेळी नागरिकांची गैरसोय होत होती. यागोष्टीकडे लक्ष देऊन विनायक दुर्गाउत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमी व परिसरात असलेल्या झुडपे, गवत काढून परिसर स्वच्छ केला. तसेच स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण केले.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सोमनाथ चव्हाण, अमित माने, विजय भोंगाळे, मनोज माने, अविनाश दगडे, सुनील भोंगाळे, सचिन माने, स्वप्निल भोंगाळे, गणेश वाघ, अक्षय दगडे, महेश भोंगाळे यांचीही उपस्थिती होती.