मसूर : धावरवाडी, ता. कऱ्हाड येथील आई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धावरवाडी-पंढरपूर वारी मार्गात रस्त्याच्या बाजूने झाडे लावून वृक्ष संवर्धनाचा तसेच संतसाहित्याचे वाटप करून एक नवा संदेश दिला आहे. विशेषत: करून शाळकरी मुलांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. धावरवाडी येथील शरद कोरडे हे गत बारा वर्षांपासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. परंतु या वारीला जाऊन सर्वजणच भक्ती करतात. आपण समाजासाठी काय वेगळे करू शकतो का हा विचार त्यांच्या मनात आला. गतवर्षी त्यांनी या वारी मार्गावर झाडे लावण्यास प्रारंभ केला. धावरवाडी ते पंढरपूर वारीमार्गावर अनेक झाडे लावण्यात आली; परंतु यावर्षी त्यांनी यामध्ये बदल घडवत या वारीमार्गावर येत असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन त्यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या हातून वृक्षलागवड केली. याकरिता त्यांनी शालेय परिसरातील आवारात खड्डे खणले. संबंधित शाळांतील चिमुकल्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. धावरवाडी ते दिघंची (जि. सांगली) पर्यंतच्या एकूण आठ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी या सर्व शाळांमधून वेगवेगळ्या वृक्षांच्या ५०० बिया व पिंपरण, गुलमोहर, वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारची ३०० झाडे लावण्यात आली. तसेच नापास मुलांचे प्रगतीपुस्तक, मनोवृत्तीवरच अवलंबून सर्वकाही या पुस्तकांचेही वाटप केले. विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देताना आज निसर्गाच्या सान्निध्यात मानवाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. ‘एक व्यक्ती एक झाड’ यापद्धतीने वृक्षलागवड झाली तर निसर्गाचा समतोल राहण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही दिली. शरद कोरडे यांचा मुंबई येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. परंतु समाजाचे देणे लागतो म्हणून काही तरी वेगळे करण्याची त्यांची धडपड आहे. म्हणूनच ते गेल्या बारा वर्षांपासून धावरवाडी ते पंढरपूर पायी वारी करत आहेत.त्यांना शिशिर कदम, मंगेश कदम, दत्ता धर्माधिकारी, योगेश धावडे, विश्वास कदम, किशोर कदम, प्रदीप शिर्के, संभाजी शेळके, सतीश मांडवेकर, नानासाहेब शेळके, महेश कदम, गोरखनाथ शेळके हे सहकारी वृक्षलागवडीसाठी मदत करत आहेत. दरम्यान, वाघेश्वर, ता. कऱ्हाड येथील प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख शकुंतला साळुंखे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत जाधव, मुख्याध्यापक एस. एस. क्षीरसागर, एस. एम. काटू, एम. एम. शेवाळे, वृषाली शेटे, मंजूषा उमरदंड, संजय सावंत, बिस्मिल्ला तांबोळी, शारदा दीक्षित, माधुरी अहिवळे, नकुशी देवकर, आनंदा शेलार, सुषमा भोसले, कांता सावंत यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला. (वार्ताहर)
‘आई प्रतिष्ठान’तर्फे वारी मार्गावर वृक्षारोपण...
By admin | Published: July 26, 2015 9:56 PM