तांबवे : येथील पवारमळा या ठिकाणच्या रस्त्यांवर पाणीसाचून डबकी तयार झाली आहेत. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, या खड्ड्यांमध्ये आत्तापर्यंत सुमारे १५ ते २० दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. याचा निषेध करुन येथील खड्ड्यांमध्ये रानपाखरे मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावानजीक रस्त्यावर पवार मळा आहे. या रस्त्यावर एका ठिकाणी १५ फुटांवर रस्ता बनविला नाही. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंला पाणी जाण्यासाठी गटारे काढलेली नाहीत. यामुळे पवारमळा येथील लोकांचे पाणी रस्त्यावर साचून राहते.या रस्त्याकडे ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत. येथे छोटा फरशी पूल बांधणे गरजेचे आहे. या रस्त्यावर आतापर्यंत १५ ते २० जण दुचाकीवरून घसरून पडले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. तरी या रस्त्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाहीत. म्हणून पवारमळा येथील रानपाखरे मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीचा निषेध म्हणून रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रानपाखरे मंडळातील सर्व युवक व महिला सहभागी झाले होते. येथील १५ फुटांच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू. रस्त्यावर भराव टाकून दोन्ही बाजूंला गटारे, नाले काढून रस्ता चांगला करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर) अनेकवेळा निवेदने देऊनही दुर्लक्ष...या रस्त्यासाठी रानपाखरे व पवारमळा येथील नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीला अनेकवेळा निवेदने दिली आहेत, तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. पवार मळ्यामध्ये तर १५ ते २० फुटांचा पॅच आहे. येथे तर पाणी साचले जाते. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याची कोणीच दखल घेत नाही. हे चुकीचे आहे. -पी. एम. पवार, माजी मुख्याध्यापक
तांबवे येथे खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
By admin | Published: July 29, 2015 9:32 PM