शहरातील सात शहीद चौकात विविध विकासकामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जनशक्ती आघाडीचे गटनेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक तसेच पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विकासकामांची पाहणी करतानाच प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे. कोरोना महामारीमुळे सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. विविध प्रकारची झाडे लावल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले राहते. उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करणाऱ्या नागरिकांना पालिका नेहमीच सहकार्य करत आली आहे. वृक्षारोपणासाठी विविध वृक्ष पालिकेकडून दिली जातील. नागरिकांनी वृक्ष लावून त्याची जोपासना करावी, असे आवाहन यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी केले.