वाई : महाराष्ट्रातील काही भागात सफरचंदाचे उत्पादन घेतले जातात. परंतु हिमाचल प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या जातीचे सफरचंदांचा दर्जा वेगळाच असतो. यासाठी असावे लागणारे पोषक वातावरण तेथे उपलब्ध आहे. वाई तालुक्यातील मांढरदेवच्या शेजारी पश्चिमेकडील डोंगराच्या पठारावर वसलेल्या वेरुळी गावातही थंड हवामान असल्याने सातारा जिल्ह्यात प्रथम थेट हिमाचल प्रदेशातून फेब्रुवारीमध्ये स्टम्प आणून त्याची रोपे तयार करून त्यांची सलग दोन एकरात लागवड करण्यात आली.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, कृषी संजीवनी सप्ताह २५ जून ते १ जुलै दरम्यान साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील वेरुळी येथे सफरचंद लागवडीचा प्रयोग दत्तात्रय जाधव व सतीश मांढरे यांच्या शेतात करण्यात आला. सातारा जिल्ह्यात प्रथम हिमाचल प्रदेशातील नोनी सोलंकी येथील सफरचंद संशोधन केंद्रातून आणलेल्या रेड विलॅक्स, रेडलम गाला, अना या जातींची सलग २ एकर क्षेत्रावर उपविभागीय कृषी अधिकारी वाई, चंद्रकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाला पंचायत समिती कृषी अधिकारी रमाकांत गोळे, मंडळ कृषी अधिकारी विजय गायकवाड, कृषी पर्यवेक्षक सचिन पवार, कृषी सहायक कांतीलाल गावित, कृषी विस्तार अधिकारी बाबर, कृषी सहायक सचिन कुंभार, आत्मा बीटीएम प्रदीप देवरे, ग्रामसेवक, सुनीता राठोड तसेच वेरुळी गावचे सरपंच सुनीता कळंबे व सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक सचिन पवार यांनी, तर दत्तात्रय जाधव यांनी आभार व्यक्त केले.
वेरुळी गाव समुद्रसपाटीपासून उंचावर आहे. तेथील थंड हवामानात सफरचंदाचे फळपीक चांगले उत्पादन व उत्पन्न देऊ शकते. त्या परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. - प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी, वाई
कृषी विभागामार्फत आत्माच्या माध्यमातून राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यामध्ये सफरचंदाची शेती आम्ही पाहिली व त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच हिमाचल प्रदेशातून सफरचंद पिकाचे स्टम्प मागवून फळबाग लागवड करण्यात आली आहे. वेरुळी गाव सफरचंदचे गाव करण्याचा आमचा मानस आहे. - दत्तात्रय जाधव, शेतकरी, वेरुळी