सातारा : जिल्ह्यात उशिरा का असेना सर्वच भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७५ इतके झाले आहे. यामुळे यावर्षीही खरीप पेरणी पूर्णत्वाकडे जाण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीनची १०५ टक्के पेर झालेली आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या २ लाख १४ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. तर आतापर्यंत भाताची लागण ३१ हजार ९६१ हेक्टरवर झालेली आहे.याचे प्रमाण जवळपास ७३ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार ५७४ हेक्टरवर तर मकेची ९ हजार ३५८ हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ७८ हजार ४५१ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण १०५ इतके आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी यंदाही वाढणार असा अंदाज आहे. तर भुईमुगाची २६ हजार ११२ हेक्टर म्हणजे ८९ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होताच. पण, मागील आठवड्यापासून पूर्व भागातील अनेक ठिकाणी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वेगाने पेरणी करु लागले आहेत. या कारणाने उशिरा का असेना खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आलेला आहे. त्यातच आताप्रमाणेच यापुढेही पाऊस सुरुच राहिल्यास पेरणी १०० टक्के होण्याचा कृषी विभागाला विश्वास आहे.
कोरेगावमध्ये १०० टक्के; फलटणला सर्वात कमी...जुलै महिन्याच्या शेवट आला आहे तरीही १०० टक्के पेरणी झालेली नाही. तरीही गेल्या १० दिवसांतील चित्र पाहता पावसाने आशादायक चित्र निर्माण केलेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी झालेली आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यात सर्वाधिक ९९.६४ टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली. तर यानंतर कऱ्हाड तालुक्यात ९५ टक्के, पाटण ९४, सातारा तालुक्यात ८६ टक्के, महाबळेश्वर ८५, जावळी ७३ टक्के, वाई तालुका ६२, खंडाळा ५० आणि माण तालुक्यात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर सर्वात कमी पेर फलटण तालुक्यात ३६ टक्के झालेली आहे.
सोयाबीन वाढणार; बाजरी रखडणार...
सध्याची स्थिती पाहता खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यापुढे बाजरीची पेरणीच होणार नाही. परिणामी यावर्षी बाजरीच्या क्षेत्रात घट होणार आहे. आतापर्यंत बाजरीची फक्त २९ टक्के पेर झालेली आहे. तर भाताची ७३ टक्क्यांवर आहे. सोयाबीन पेर जवळपास ७९ हजार हेक्टरपर्यंत गेली. त्यामुळे १०५ टक्क्यांवर पेरणी गेली आहे. ज्वारीची ६८ टक्के झालेली आहे.