- प्रगती जाधव-पाटीलसातारा - मार्केटिंगच्या या युगात लोकांना घराबाहेर काढायचं म्हटलं तर त्यांना एखाद्या सेलिब्रिटीचे आमिष दाखवावे लागते. मात्र, रविवारी कास तलाव परिसर स्वच्छतेच्या मोहिमेने लोक चळवळीचे रूप धारण केले. भल्या पहाटे साडेपाच पासूनच यवतेश्वर घाट रस्त्यावर कास स्वच्छतेसाठी जाणाऱ्यांची वाहने वळली. अवघ्या दोन तासांत अडीचहून अधिक टन कचरा गोळा करून रावाने नव्हे तर गावानेच स्वच्छता करून कास सातारकरांचा विकपॉईंट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
साताऱ्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या उंची वाढीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पावसाळ्यात तलावात पूर्ण पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक व इतर हानिकारक कचरा पाण्यात जाऊन दूषित पाणी पिण्याचा धोका ओढवू शकतो. आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम संभवतात. हे प्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला. त्याला हरित सातारा ग्रुप, सातारा नगरपालिका व वनविभागाने सहकार्य केले.
प्लास्टिकमुक्त कास तलाव या विशेष श्रमदान मोहिमेला रविवारी (२९) सकाळी कास बंगल्याजवळून सुरुवात झाली. पावसाळ्याच्या तोंडावर तलावात होणारे प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी सातारकरांचे बळ एकवटल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अभियानाच्या समन्वयकांनी आधीच कचरा गोळा करण्यासाठी पोती, काठ्या, लोखंडी आकडे, हातमोजे आदी आवश्यक साहित्य एकत्रित करून ठेवले होते. श्रमदानासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा वयोगट लक्षात घेऊन कोणी कोठे श्रमदान करायचे, याचे नियोजन करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर श्रमदानास सुरुवात झाली. पाहता पाहता हजारहून अधिक लोकांचा समूह कास तलावाच्या काठावरील खुरट्या, सदाहरित जंगलात विखुरला गेला. झाडा-झुडपांमध्ये, काटेरी जाळीतही कचरा विखरून पडला होता. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक आढळले. नागरिकांनी हँडग्लोज घालून कचरा वेचला. प्लास्टिकचे कागद, बाटल्या, फुटलेल्या काचा व इतर साहित्य असे कचऱ्याचे वर्गीकरण करून तो एकत्रित करण्यात आला.