सातारा : सातारा शहरातील काही भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशवींचा वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. सुरुवातीच्या काळात प्लास्टिक पिशवींचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली; पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आजही साताऱ्यातील काही फळ विक्रेते प्लास्टिक पिशवीतून फळे देताना दिसून येत आहेत.
.........................................................
कोरोना रोखण्यासाठी
अजूनही उपाययोजना
दहिवडी : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी माण तालुक्यातील अनेक गावांत आजही उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. माणमधील अनेक गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या प्रमाण कमी झाले असले तरी अनेक गावांनी आजही शासन नियमांचे पालन सुरूच ठेवले आहे. तसेच ग्रामस्थही नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.
........................................................
नादुरुस्त वाहनांचा धोका
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू असल्याने ऊस वाहतूक वाहने धावू लागली आहेत; पण अनेकवेळा ही वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यासाठी सर्वच तालुक्यांत ऊस वाहतूक सुरू आहे. कारखान्याकडे ऊस नेताना काहीवेळा वाहने नादुरुस्त होतात. त्यामुळे अशी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. रात्रीच्यावेळी या बंद वाहनांचा दुसऱ्या वाहनचालकाला अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
.........................................................
डोंगरपायथा रस्ता
डांबरीकरणाची मागणी
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील बनगरवाडी ते श्री भोजलिंग डोंगर पायथा रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सुमारे चार किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर जागोजागी चरी खोदलेल्या आहेत. तसेच खड्डेही पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागत आहे.
...........................................
घंटागाड्याांना उशीर
सातारा : सातारा शहरातील काही भागात घंटागाड्या उशिरा येत आहेत. यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातच अशी परिस्थिती अधिक आहे. तसेच यामुळे काही नागरिक रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत असतात.
.........................................