परळी : ‘परळी वावदरे, रेवंडे अशा दुर्गम असलेल्या गावांतील समस्या प्राधान्याने सोडवणार,’ असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांनी विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या कमल जाधव, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्या विद्या देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू भाऊ भोसले, वावदरेचे सरपंच रामचंद्र जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
राजापुरी फाटा ते वावदरे रेवंडे फाटा डांबरीकरण व राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी राजू भोसले म्हणाले, ‘दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून या पठारावर लघु पाटबंधारेचे प्रकल्प उभारण्यात आले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत गावोगावी रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. येथील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ठोसेघर, चाळकेवाडी या पर्यटन स्थळामुळे पर्यटन वाढीला चालना मिळाली आहे. गावोगावी जोडलेले रस्ते एमएमआरडीए मध्ये जोडण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यांची देखभाल दुरुस्ती तत्काळ होईल.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भिकूभाऊ भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम विभाग व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. ठोसेघर पठारावरील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. रोहिदास जगताप यांनी आभार मानले.