सातारा : स्वयंसेवी संस्थेला जिल्हा युवा केंद्रामार्फत मिळणारे अनुदान आॅनलाईन जमा करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना क्रीडाधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.तानाजी आप्पा मोरे असे अटक करण्यात आलेल्या क्रीडाधिकाऱ्याचे नाव आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अखत्यारीत जिल्हा युवा केंद्रामार्फत एका सामाजिक स्वयंसेवी संस्थेला अनुदान मिळाले होते. हे अनुदान आॅनलाईन जमा करण्यासाठी मोरे याने संबंधित संस्थेच्या चालकांकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. या संस्थेने शुक्रवारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला.तानाजी मोरे याने तक्रारदारांकडे पंच साक्षीदारांसमक्ष पाच हजार रुपयांची मागणी केली आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात ही रक्कम स्वीकारली. त्याचवेळी ‘एसीबी’च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. मोरे यांच्याविरुद्ध ‘एसीबी’ने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ‘एसीबी’च्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
क्रीडाधिकारी लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: June 19, 2015 11:39 PM