मलकापूर : कऱ्हाड तालुक्याला सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्राचाही मोठा वारसा आहे. कऱ्हाडच्या खाशाबा जाधव यांनी कुस्ती प्रकारात आॅलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक देशाला मिळवून दिले. त्यानंतरही महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी येथील मातीने घडवले आहेत. आजही ती परंपरा जपली जात असताना पश्चिमात्य खेळांचेही येथील तरुणांना वेड लागल्याचे पाहायला मिळते. क्रिकेट व इतर खेळांची आवड तरुणांना आहेच; पण त्याही पुढे जाऊन आता स्नूकर (बिलीयर्डस्) सारख्या खेळाला तरुणांचा प्रतिसाद मिळत आहे. कऱ्हाड तालुक्याला यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसा आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात खाशाबा जाधव यांचा वारसा आहे. राष्ट्रीय पातळीवर नेमबाजीत मलकापूरच्या शीतल थोरात हिने नुकतेच यश मिळविले आहे. तिच्यासह अनेक खेळाडूंनी कऱ्हाडचे नाव देशपातळीवर पोहोचवले आहे. स्केटिंग, क्रिकेट यासारख्या खेळाचा गल्लीगल्लीत सराव केला जात आहे. त्यातच सध्या पाश्चिमात्य खेळांची ओढ चांगलीच वाढल्याचे दिसते. कऱ्हाडबरोबरच मलकापूर व विद्यानगर परिसरात शैक्षणिक क्रांती होऊन विविध संस्थांची शैक्षणिक संकुले उभी राहिली. अशा शैैक्षणिक सुविधा मिळाल्यामुळे देश-विदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या तरुण -तरुणांची संख्याही वाढली. एकमेकांच्या सानिध्यातून तरुण-तरुणींमध्ये इतर पाश्चिमात्य खेळाचे आकर्षणही वाढत गेले. त्याचाच परिणाम म्हणून स्नूकर (बिलीयार्डस्) सारख्या खेळाच्या अॅकॅडमी मलकापुरात सुरू झाल्या आहेत. क्यू मास्टर, स्नूकर अॅकॅडमी तर्फे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील खेळाडूंसाठी विभागीय स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावरून स्नूकरसारख्या पाश्चिमात्य खेळालासुद्धा या भागातील तरुण आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड मलकापूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. मलकापुरात कृष्णा विद्यापीठ व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच्या खेळापेक्षा वेगळे काहीतरी करण्याचा विचार असतो. सध्या त्यांच्यासाठी स्नूकर खेळ उपलब्ध झाल्याने अशा अॅकॅडमीच्या ठिकाणी त्यांची गर्दी होताना दिसत आहे. या अॅकॅडमीमध्ये विभागीय स्पर्धाही भरविल्या जातात.
मातीतल्या खेळाडूंना ‘स्नूकर’चे वेड
By admin | Published: February 15, 2015 8:53 PM