सातारा : कोविड काळात शिक्षण देण्या-घेण्यासाठी फार मोठा समस्यामय संघर्ष करावा लागत आहे. काही वर्गांमधून सुरू करण्यात आलेले प्रत्यक्षातील शिक्षण हे वाढत्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे थांबवावे लागले. मात्र पर्यायी ऑनलाईन, ऑफलाईन व्हर्च्युअल शिक्षणपध्द्ती व अन्य काही साधनसामग्रीचा वापर करून सध्याला हे शिक्षण मात्र सुरूच ठेवण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून लोधवडे येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक सतेशकुमार माळवे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन झाडाखालचे आनंददायी शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
पूर्वीची आपल्या भारत देशाची निसर्ग सान्निध्यातील झाडाखालची आश्रमास्थ शिक्षण व्यवस्था ही पुन्हा या कोरोना संकटाच्या काळात काहीअंशी नव्याने वापरात व उपयोगात आणली जाऊ लागली आहे. नवेपणाने ती अवतीर्ण होत आहे. हाच एक धागा पकडून माळवे यांनी झाडाखालचे आनंददायी शिक्षणाचा एक अभिनव शैक्षणिक प्रयोग राबविला आहे. सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना द्यावयाच्या गृहभेटीदरम्यान हा उपक्रम राबविला आहे. सर्व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काळजी घेऊनच या शैक्षणिक प्रयोगाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या शैक्षणिक प्रयोगात विद्यार्थी गृहभेटीवेळी त्यांच्याच घराजवळील झाडाखाली सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून एकावेळी एकाच विद्यार्थ्यास व्यक्तिगतरित्या मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होण्यास चांगलीच मदत झाली आणि होत आहे. या प्रयोगाने विद्यार्थी हा अभ्यास व अध्ययनप्रवण बनला आहे. या शैक्षणिक प्रयोगाने शिक्षणाचे धडे गिरविण्याचे चांगले कार्य या संकट काळात घडले आहे.
ज्या गोरगरीब मुलांना अँड्रॉईड मोबाईल मिळू शकत नाही, त्यांना तर हा शैक्षणिक प्रयोग म्हणजे खरे तर एक वरदानच ठरला आहे. सतेशकुमार माळवे यांच्या या शैक्षणिक प्रयोगाचे लोधवडे गावातील असंख्य ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
फोटो आहे :