दहिवडी : लेकीनं दहावीत ९८ टक्के गुण मिळविल्याने सर्वजण आनंदून गेले; पण त्यास कोणाची तरी दृष्ट लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका सत्कार समारंभाहून परतत असताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत गेले, अशा स्थितीत जीवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांची अवस्था पाहून यशस्वी मयुरीच्या तोंडून एकच आर्त हाक बाहेर पडतेय, ती म्हणजे... प्लीज माझ्या पप्पांना वाचवा हो!
बिदाल, ता. माण येथील नव महाराष्ट्र विद्या मंदिरात श्रीपती कृष्णा बोराटे हे अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम करतात. त्यांची मुलगी मयुरी बोराटे हिला दहावीमध्ये ९८ टक्के गुण मिळाल्याने फलटण केंद्र्रात प्रथम आली.
बिदाल गावचे नावउंचावले, याचा सर्वांनाच अभिमान वाटला; पण काळजाचा ठाव घेणारी वाईट घटना घडली. मयुरीला चांगले मार्कस् मिळाल्याने अनेक ठिकाणी तिचा सत्कार झाला. असाच सत्कार नायगाव, ता. खंडाळा येथून उरकून दुचाकीवरून दि. २० जून रोजी वडील श्रीपती बोराटे यांच्या सोबत घरी येत असताना त्यांचा कमिन्स कंपनीजवळ अपघात झाला. त्यामध्ये मयुरीच्या हाताला तर श्रीपती यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अपघातात मुलगी मयुरी सुखरूप आहे; पंरतु वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. बेशुद्धावस्थेत उपचार घेत आहेत. अशावेळी त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता मानवतेच्या दृष्टीने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
मयुरीला मिळालेल्या गुणामुळे ती बिदालचे नाव उज्ज्वल करणार यामुळे गावात तिचे कौतुक होत होते; मात्र या घटनेमुळे तिच्याही मनावर परिणाम होणार होता, यातून सावरण्यासाठी वडिलांना बरे करण्यासाठी बिदालकरांनी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या मदत करण्याचे काम सुरूआहे.आतापर्यंत दीड लाख रुपये जमा..मयुरीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बिदालकरांनी पहिल्याच दिवशी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली तर दुसºयाच दिवशी पुन्हा ६२ हजार गोळा केले तर टाकेवाडीचे उद्योजक सागर घोरपडे यांनीही ५० हजारांची मदत केली. आतापर्यंत दीड लाखाची मदत बँकेत जमा झाली आहे.