भुर्इंज : चांदक, ता. वाई येथे कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत खोदण्यात आलेले शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न पडला आहे. ज्या गटनंबरमध्ये आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावर कृषी विभागाने शेततळ्याची लाखांची रक्कम खर्च केली आहे. त्या गटनंबरमध्ये शेततळेही नाही आणि त्या शेतकऱ्यालाही या शेततळ्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेततळे नेमके गेले कुठे? आणि लाखातील रकमेवर हात मारणाऱ्या साखळीमध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकरी हिताच्या योजनांना प्राधान्य देत असून, ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वकांक्षी योजना त्यापैकी एक मात्र, अधिकारी गावातील काहींना हाताशी धरून योजनांचा निधी भलतीकडेच कसा वळवतात याचे खळबळजनक उदाहरण चांदक येथे पाहावयास मिळाले आहे. चांदक येथील शेतकरी विश्वास महादेव भिलारे यांना शेततळे मंजूर झाले होते. त्यांच्या शेताचा गट क्र. ९५४ मध्ये शेततळे खुदाईस परवानगी मिळाली होती. मात्र, भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र सरकार दरबारी घडले ते भलतेच. भिलारे यांच्या गट नं. ९५४ मध्ये शेततळे खोदल्याची कागदपत्रे रंगली आणि शासनाच्या तिजोरीतून १ लाख ५२ हजार १६० रुपयांची खर्चीही पडली.गट नं. ९५४ सह विश्वास भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र, सरकार दरबारी आणि कागदोपत्री मात्र ते शेततळे अस्तित्वात आहे, असे असेल तर शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न परिसरातील जनतेला सतावत आहे.विश्वास भिलारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या शेतात शेततळेच नाही, असे सांगून याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाच्या चांगल्या योजना कोण-कोणाच्या फायद्यासाठी वाकवतंय, तुडवतंय स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करतंय? या प्रकरणी चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाने संबंधित विभागाची लक्तरे चव्हाट्यावर आली असून, या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चांदकमधून चक्क शेततळेच चोरीला !
By admin | Published: May 05, 2016 11:31 PM