तांबवे येथील जुना पूल सतत पाण्याखाली जात होता. त्यामुळे नवीन उंच पूल बांधण्यात आला; मात्र तोही यंदा पाण्याखाली गेला. पुलाचे पूर्वेकडील कठडे व लोखंडी अँगल वाहून गेले असून, पुलाचे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस पुलावरून पाणी वाहत होते. पाण्याचा वेग जास्त व पुरात वाहून आलेली लाकडे अडकल्यामुळे अँगल तसेच कठडे तुटले आहेत. पूर्वेकडील बाजूचा रस्ताही खचून तो वाहून गेला आहे. परिणामी, पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तांबवे गावाचा संपर्क तुटला आहे. नवीन पूल बांधून जेमतेम चार वर्षे झाली आहेत; मात्र तोपर्यंत दोन वेळा पूल पाण्याखाली गेला. जुन्या पुलाची जी अवस्था होती, तशीच अवस्था आता नवीन पुलाची झाली आहे. दोन्ही बाजूला बांधकाम विभागाने मजबूत भराव केला नव्हता. संरक्षक भिंतही अपुरी बांधली. एका बाजूला दगडाचे पिचिंगही व्यवस्थित न केल्याने पुलाजवळील भराव पाण्यात वाहून गेला असून, रस्ता खचला आहे. नवीन पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने व्यवस्थित केलेले नाही.
- चौकट
ग्रामस्थांनी रात्र जागून काढली
गत दोन दिवस कऱ्हाड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यातच कोयना धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या साजुर, म्होप्रे, तांबवे, किरपे, येरवळे, पश्चिम सुपने, सुपने, वारूंजी या गावांना पुराचा फटका बसला. शुक्रवारी रात्री तांबवे गावात पारापर्यंत पुराचे पाणी गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरला.
फोटो : २४केआरडी०८
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथील पुलाला पुराच्या पाण्यातून वाहून आलेली झाडे, झुडूपे, लाकडे अडकली असून, पुलाचे नुकसान झाले आहे. (छाया : दीपक पवार)