यावेळी सिद्धार्थ कीर्तीकर, भीमराव कीर्तीकर, सयाजी किरत, जितेंद्र किरत, शहाजी किरत, शंकर ताटे, रघुनाथ किरत, चंद्रकांत किरत, अशोक किरत, प्रमोद किरत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मौजे कवठे गावातील पडीक क्षेत्रातून बौद्ध समाजासह सर्व शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता असून, हा रस्ता मरिआई मंदिराच्या पाठीमागील बाजूस जातो; मात्र गत काही दिवसांपासून जबरदस्ती व दांडगाव्याने पाणंद रस्त्यावरच नांगरट करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक बंद होऊन सर्वांना वेठीस धरण्यात आले आहे. सध्या ऊसतोडी सुरू असून, रस्त्यामुळे वाहतूक करता येत नसल्याने ऊसतोडी बंद झाल्या आहेत. शेकडो एकर क्षेत्र ऊसतोडीअभावी पडून असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ज्यांनी हा रस्ता जबरदस्तीने नांगरट केला आहे, त्यांचा या पाणंद रस्त्याशी कोणताही संबंध नाही; मात्र गत दोन वर्षांपासून दांडगाव्याने सर्वांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बौद्ध समाजातील बांधव व शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मंडलाधिकारी व तलाठी यांनी या जागेची पाहणी करून रीतसर पंचनामा तहसीलदारांकडे दिला आहे; मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उंब्रज पोलीस ठाणे यांना रितसर निवेदन देण्यात आले आहे.
- चौकट
ऊस गळतीला न गेल्यास भरपाई द्यावी!
पाणंद रस्ता वाहतुकीसाठी खुला करून या रस्त्यावर कोणताही संबंध नसताना दांडगाव्याने नांगरट करून रस्ता बंद केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांचा ऊस गळीताला न गेल्यास संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी. रस्ता खुला करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो : ११केआरडी०२
कॅप्शन : कवठे, ता. कऱ्हाड येथील पाणंद रस्त्यावर नांगरट केल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.