PM Modi vs Congress, Satara Speech: लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) सातपैकी दोन टप्प्यातील मतदान शांततेता पार पडले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघासह गुजरात, तेलंगणा राज्यातलही निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात तीन जाहीर सभा घेतल्या. सोमवारी मोदी आधी सोलापूरला भाजपाचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत हजर झाले. त्यानंतर त्यांनी सातारा येथे भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला हजेरी लावली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला सज्जड दम भरला. मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असे त्यांनी खडसावले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसच्या लोकांना अजिबात संविधान बदलू देणार नाही. काँग्रेस सातत्याने काही आरोप करत आहे. पण हा त्यांचा डाव आहे. काँग्रेस आणि आघाडीवाल्यांनो नीट ऐका, जोपर्यंत मोदी जिवंत आहेत आणि जोपर्यंत मला जनतेकडून भरभरून आशीर्वाद मिळत आहे, तोवर तुम्ही धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. आणि संविधान तर मूळीच बदलू शकणार नाही," असे पंतप्रधान मोदींनी खडसावून सांगितले.
"देश स्वतंत्र झाला असला तरी काँग्रेसने गुलामगिरीची मानसिकता देशात तशीच ठेवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास होता, पण इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांच्या चिन्हाचाच भाग ठेवण्यात आला होता. भाजपाचे सरकार आल्यानंतर हे चिन्ह बदलले आणि नौदल ध्वजावर छत्रपती शिवाजी महारांजाच्या चिन्हाला स्थान दिले गेले," याकडे मोदींनी लक्ष वेधले.
"आज आपले भाजपा सरकार दरमहा ८० कोटी गरजू लोकांना मोफत अन्नधान्य पुरवत आहे. पण काँग्रेस सरकारची गरिबांप्रती काय वृत्ती होती, याचा अंदाज त्यांच्या धोरणांवरून लावता येऊ शकतो. काँग्रेसची सत्ता असताना सरकारी गोदामांमध्ये हजारो टन धान्य सडून जायचे. मात्र काँग्रेस सरकार ते गरिबांना द्यायला तयार नव्हते," अशी सडकून टीका मोदींनी काँग्रेसवर केली.