बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीने प्रवास करण्यासाठी शासनाकडून मोफत पास देण्यात आले आहेत, तर अन्य विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास आहेत. मात्र, कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर सकाळच्या वेळी एसटीच्या अल्प फेऱ्या होत असल्याने एसटीची तासन् तास प्रतीक्षा करून शेवटी वडापने प्रवास करावा लागत आहे. परिणामी सवलत पास असतानाही दुप्पट पैसे देऊन खासगी वडापने प्रवास केला तरी, कॉलेजच्या वेळेत पोहोचता येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
कुसूर ते कऱ्हाडपर्यंतच्या प्रवासाचा पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचशे ते साडेपाचशे रुपये भरावे लागतात. मात्र सवलतीशिवाय प्रवास करावयाचा झाल्यास दिवसासाठी साठ रुपये मोजावे लागत आहेत, तर कऱ्हाड बसस्थानक ते विद्यानगर एसटीचा मासिक सवलत पास शंभर रुपये आणि सवलतीशिवाय एका दिवसाला चाळीस रुपये मोजावे लागत आहेत. सवलत प्रवासी पास असतानाही महिन्याला अडीच ते तीन हजार प्रवासासाठी विद्यार्थ्यांना खर्च करावे लागत आहेत.
- चौकट
विद्यार्थ्यांशी वाहकांचा उद्धटपणा
सकाळी एसटीच्या कमी फेऱ्या ठेवणे, अवेळी एसटी येणे, तसेच एसटी चालक, वाहकांच्या चुकीच्या वर्तनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एसटीमध्ये जागा असतानाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेतले जात नाही. पाठीमागून बस येत असल्याचे वाहकाकडून सांगून, बसमध्ये चढलेल्या विद्यार्थ्यांना खाली उतरवले जात आहे.