लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : वडोली निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील चौघांना विषबाधा झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, विषबाधा नेमकी दुधातून की अन्नातून झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.सुलोचना शंकर चव्हाण (वय ७०), निकिता जितेंद्र पवार (१३), जितेंद्र संभाजी पवार (४७), प्रीतम जितेंद्र पवार (सर्व, रा. वडोली निळेश्वर) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोली निळेश्वर येथील काहीजणांना बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला हा प्रकार पित्तामुळे होत असावा, असा समज झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्यामुळे तसेच एकापाठोपाठ गावातील चौघांना हाच त्रास होऊ लागल्यामुळे घाबरलेल्या नातेवाइकांनी संबंधितांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तपासणी केली असता संबंधित चौघांनाही विषबाधा झाल्याचे समोर आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने रुग्णालय व गावात भेट देऊन चौकशी केली. त्यावेळी चौघांनीही दूध पिल्यानंतर त्यांना हा त्रास जाणवू लागल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मात्र, विषबाधा अन्नातून नेमक्या कोणत्या पदार्थ अथवा घटकामुळे झाली की दुधामुळे हे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या चौघांनी जे अन्नपदार्थ खाल्ले, त्यातील काही पदार्थ तसेच दुधाचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. त्याच्या तपासणी अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण समोर येणार आहे. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.
वडोलीत चौघांना विषबाधा
By admin | Published: July 06, 2017 11:42 PM