कुडाळ : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सध्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीही घरी राहणे गरजेचे आहे. तरीही काही लोक विनाकारण फिरताना आढळतात. शुक्रवारी जावळीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी कुडाळ येथे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा दाखवला आहे.
कुडाळ येथील विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची थेट कुडाळ तेथील आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. तरीही नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चौकट :
प्रशासनाला सहकार्य करावे : माने
जावळी तालुक्यातील कोरोनाबधितांचा कमी होत असलेला आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोना नियंत्रणासाठी आता गावोगावच्या शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची सोय केलेली आहे. नागरिकांनी दक्षता घेऊन घरातून बाहेर पडणे टाळावे. कोणत्याही कारणास्तव जर का कोणी मोकाट फिरताना आढळला, तर त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई होईल, याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जावळीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी केले आहे.