स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात खुलेआम गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. मात्र, दीड महिना होऊनही तक्रारदार नसल्याने गुन्हा दाखल नाही, पोलीस आणि पीसीपीएनडीटी प्राधिकरणाच्या समन्वयाअभावी संशयित आरोपी अद्याप मोकाट आहे.याबाबत माहिती अशी की, औंध परिसरात नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा मोटारसायकलीवर पाठीमागे पिवळ्या रंगाची मोठी सॅक घेऊन संशयितरीत्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला होता.तो केवळ नववी पास असून, त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. तसेच तो गर्भलिंग निदान करण्यासाठी गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, त्यासाठी पोलिसांना तक्रारदारच न मिळाल्याने गुन्हा दाखल न करता सोडून दिले. आपण तक्रार केली तर आपणीही पोलिसांच्या कचाट्यात सापडू, अशी भीती वाटत असल्यानेच तक्रारदार पुढे येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सुमोटेनेही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही होत आहे.कारवाईचे अधिकार पोलिसांना नाहीतगर्भलिंग तपासणी, झडती, जप्ती करून न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. तर त्यासाठी शासनाने जिल्हा समुचित प्राधिकरणाची स्थापना केली आहे. पोलिसांनी नाथा खाडेवर कारवाईदरम्यान संबंधितांशी चर्चा केली नाही किंवा तशी कल्पनाच दिली नाही, असे पीसीपीएनडीटीचा आरोप आहे.मोठे रॅकेट असण्याची शक्यतानाथा खाडे याने म्हसवड येथील एका डॉक्टरकडे काम करत असताना त्याने गर्भलिंग निदानाची तांत्रिक माहिती घेतली होती. तसेच ती मशीन त्याने त्या डॉक्टराकडूनच खरेदी केली होती. हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, त्या डॉक्टरमार्फत हे खुलेआम चालले होते, हे तपासात निष्पन्न झाले. मात्र, अद्याप तपासाची प्रक्रिया थांबल्याने अजूनही गर्भलिंग तपासणीचा गोरख धंदा सुरूच आहे.
पोलिसांनी पकडला..परंतु फिर्यादीअभावी सुटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 10:59 PM