सातारा : पाटण येथील जुन्या एसटी स्टॅन्ड परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असलेल्या दोघा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक गोळी, मोबाईल, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आकाश उत्तम कोळी (वय २३, रा. नवरत्न चौक, मोरे गल्ली, पाटण), सागर गौतम वीर (वय २४, रा. मुळगाव रोड, पाटण) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पाटण येथील जुन्या बसस्थानक परिसरात हे दोघे दुचाकीवरून संशयितरित्या फिरत होते. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये गावठी कट्टा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी टीमसह पाटण येथे सापळा लावला. यावेळी कोळी आणि वीर हे दोघे पोलिसांना सापडले. त्यांच्याकडून गावठी कट्टा, एक गोळी जप्त करण्यात आली असून, गावठी कट्टा या दोघांनी कोणाकडून विकत आणला, कट्टा बाळगण्याचे कारण काय? याबाबत पोलीस दोघांकडे कसून चौकशी करत आहेत.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, पोलीस नाईक मोहन नाचण, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धिरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला.