चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला खीळ बसली आहे. विभागातील ज्या गावांनी या योजनेत सुरुवातीला हिरीरीने सहभाग घेतला, त्याच गावातील किरकोळ स्वरूपाचे तंटे सध्या चाफळ पोलीस दूरक्षेत्रात वारंवार दाखल होत आहेत. या गावांनी फक्त बक्षिसापुरताच सहभाग घेतला होता की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या तंटामुक्त गाव समित्यांना ऊर्जितावस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. आघाडी शासनाच्या काळात संपूर्ण राज्यात प्रशासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजना प्रभावीपणे राबविली. ग्रामीण भागातूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. परिणामी सहभाग घेतलेल्या प्रत्येक गावाला रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. यामुळे काही अंशी गावाचा विकासही होण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली. गावातील किरकोळ स्वरूपाचे तंटे गावातच मिटू लागल्याले वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली. गावागावांत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहू लागली. जनमाणसात प्रेमाची भावना वाढीस लागली. तंटे गावातच मिटविण्यासाठी प्रमुख मंडळी यात सहभाग घेत होती. यातून विभागातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही बिनविरोध होण्यास मदत झाली; परंतु गावपातळीवरच स्थानिक पुढाऱ्यांनीच या योजनेला खो घालत राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने खऱ्या अर्थाने ग्रामस्थांची मानसिकता बदलून फिर्यादी थेट पोलिसांच्या दारात जात असल्याचे चित्र बऱ्याच गावात दिसून येत आहे.पती-पत्नीचे भांडण असो, अथवा जमिनीच्या हद्दीचे तंटे, या योजनेमुळे गावागावांतच मिटत होते; परंतु सध्याची परिस्थिती याउलट झाल्याने ग्रामस्थ थेट पोलीस ठाणे गाठू लागल्याने ही योजना फक्त कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने या तंटामुक्त गावांच्या समित्यांच्या व प्रमुख मंडळीच्या गावोवावी बैठका घेऊन या समित्यांना ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात !
By admin | Published: November 19, 2014 9:58 PM