कोपर्डे हवेली : गावातील तंटे गावातच मिटावेत, यासाठी गावोगावी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे़ या मोहिमेत यश मिळविणाऱ्या गावाला शासनाकडून पुरस्कारही दिला होता. त्यामुळे लहान-मोठी अनेक गावे या योजनेत सहभागी होऊन ‘तंटामुक्त गाव’ची संकल्पना सत्यात उतरवतात. सध्या मात्र ही परीस्थिती बदलली असुन बहुतांश गावांतील तंटामुक्त समित्या कागदावरच राहिल्या आहेत. संबंधित समित्या कार्यरतच नसल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. गावामध्ये शांतता रहावी, हेवेदावे कमी व्हावेत, यासाठी पोलीस आणि गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सदस्य प्रयत्न करत असल्याचे चित्र काही गावांमध्ये आहे़ लोकसंख्या कमी असणाऱ्या गावामध्ये तंटामुक्त गाव मोहिमेला यश मिळाले आहे़ मात्र, जास्त लोकसंख्येच्या गावामध्ये ही समिती कागदावरच दिसत आहे़ लोकसंख्या जास्त असणाऱ्या गावामध्ये तंटेही जास्त होतात. त्यामुळे वाद मिटविताना समितीचे अध्यक्ष, सदस्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे समिती असुनही अध्यक्ष व सदस्य काही वादांकडे दुर्लक्ष करतात. समिती कार्यक्षम रहावी, यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत़ तसेच पोलीस प्रशासनानेही या योजनेकडे सध्या पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गटातटाच्या राजकारणामुळे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परीस्थिती होते. गावाचे गावपण टिकवण्यासाठी तंटामुक्त समितीची निर्मिती झाली़ या समित्या प्रबळ आणि व्यापक होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)
तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात !
By admin | Published: September 03, 2014 8:40 PM