सातारा : जामिनावर सुटका होताच घरी जाऊन तोतया पोलिसाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दुपारी दीडच्या सुमारास गजवडी, ता. सातारा येथे घडली.रवींद्र विश्वंभर कारंडे (वय ३०, रा. गजवडी, ता. सातारा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रवींद्र कारंडे याने दोन दिवसांपूर्वी ह्यमी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांचा अंगरक्षक बोलत असल्याचे सांगून बगाडे नावाचे पोलीस कर्मचारी मुलांना दमदाटी करून पैसे मागतात.
यासंदर्भात आयजी कार्यालयात तक्रार आली आहे, असा फोन नियंत्रण कक्षामध्ये त्याने केला. पोलिसांनी आलेल्या फोन नंबरवरून माहिती घेतली असता हा फोन रवींद्र कारंडेचा असल्याचे समोर आले. कारंडे हा पोलीस नसतानाही त्याने बनवेगिरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. तो बुधवारी दुपारी घरी गेला. घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडाला साडीने गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात येताच आईने तत्काळ रवींद्रच्या गळ्याचा फास सोडविला.
त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याने हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणातून केला, हे अद्याप समोर आले नाही. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.