शिरवळ : शेतामध्ये ठेवलेल्या शेतमजुराने कमालच केली असून, शेळ्यांसहित तब्बल ८३ हजार ५०० रुपये किमतीचे शेतामधील विविध साहित्य चोरत धमाल करत शेतामधून कुटुंबीयांसमवेत धूम ठोकलेल्या शेतमजुराच्या मुसक्या मोठ्या शिताफीने आवळण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पिंटू फुलसिंग चव्हाण (रा. कलमल्ली तांडा, जिल्हा कोप्पाल, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या शेतमजुराचे नाव आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लिंब (सातारा) येथील आप्पासाहेब विष्णू सावंत (वय ६१) यांनी वडगाव पोतनीस (ता. खंडाळा) याठिकाणी साडेचार एकर जमीन विकत घेतली आहे. या जमिनीमध्ये सावंत यांनी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. दरम्यान, त्याठिकाणी ६ सप्टेंबर २०१८पासून जमिनीची मशागत करण्याकरिता पिंटू चव्हाण याला कुटुंबीयांसमवेत पगारावर कामावर ठेवले होते. दि. १९ डिसेंबर २०२० रोजी आप्पासाहेब सावंत हे संबंधित ठिकाणी आले असता, त्याठिकाणी पिंटू चव्हाण हा शेतमजूर आपल्या कुटुंबीयांसवेत न दिसल्याने सावंत यांनी चौकशी केली. त्यावेळी संबंधित शेतमजूर हा शेतामधील साहित्य घेऊन परागंदा झाल्याचे निदर्शनाला आले. यावेळी पिंटू चव्हाण याने शेतामधील ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शिरवळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे यांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतमजूर पिंटू चव्हाण हा कर्नाटक राज्यामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचत पिंटू चव्हाण याच्या मुसक्या आवळल्या. पिंटू चव्हाण याला शिरवळ पोलिसांनी पोलीस कोठडी संपल्यानंतर खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पिंटू चव्हाण याच्याकडून शिरवळ पोलिसांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.