लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाºया वाई हत्याकांडामध्ये आणखी नव-नवे खुलासे होत असून, डॉ. संतोष पोळने आणखी ३० जणांचे खून केल्याचा दावा केला आहे. यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. परंतु तरीसुद्धा तपासाचा भाग म्हणून त्याचा तपास घेण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकापाठोपाठ सहा खुनांची मालिका समोर आल्याने पोळचा खरा चेहरा उघड झाला. सुरुवातीला तो मी नव्हेच, अशा आविर्भावात असलेल्या पोळने पोलिसी खाक्यानंतर सहा खुनांची कबुली दिली. मात्र, एवढ्यावरच न थांबता त्याने त्याचवेळी आणखी ३० जणांचे खून केले आहेत, असा दावा वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडे केला होता. मात्र, त्याचा हा दावा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे वेताळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, पोळने हा दावा करून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरी सुद्धा खातरजमा म्हणून त्याच्याकडे तपास करणे गरजेचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी न्यायालयाकडे तपासासाठी परवानगी मागितली आहे. आता यावर ९ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.
संतोष पोळ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटे दावे करत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ३० खून केले आहेत. तर आमच्या डायरीमध्ये तीसजण बेपत्ता हवेत ना? जे बेपत्ता होते. त्यामध्ये काहींनी लग्न केले.विनायक वेताळ (पोलिस निरीक्षक वाई)