औंध : विनयभंग प्रकरणातील आरोपी असलेला खटाव तालुक्यातील उंचीठाणे येथील अमोल सूर्यकांत यादव (वय २८) याने पाणी पिण्याचा बहाणा करून औंध पोलिस ठाण्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमोल यादव याच्यावर विनयभंग प्रकरणात अटक वारंट बजाविण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी संशयित आरोपी अमोल यादव यास अटक करून वडूज न्यायालयासमोर हजरकेले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यास सातारा येथे घेऊन जात असताना औंध येथे आणले होते. मात्र, पाणी पिण्याच्या बहाण्याने त्याने पोलिसांचे लक्ष चुकवून ठाण्यातूनच पलायन केले. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून सुभाष डुबल यांच्याकडे कार्यभार होता. आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्यामुळे औंध पोलिसांच्या कार्यक्षमता व सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यातूनच आरोपी पळून गेल्याने मागील दोन दिवसांपासून पोलिसांची झोपच उडाली आहे. औंध, पुसेसावळी, खटाव तालुक्याचा सर्व भाग पोलिसांनी पिंजून काढला आहे. मात्र संशयित आरोपी अमोल यादव अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्याला पकडण्याची मोहिम सुरूच आहे. (वार्ताहर)
पोलिस ठाण्यातून आरोपी पळाला!
By admin | Published: February 15, 2017 10:38 PM