कुकुडवाड : रताळे, कोथिंबीर विकणाऱ्या महिलेचे दागिने आणि रोकड ठेवलेले पाकीट हरवले. काबाडकष्ट करून जमविलेले दागिने, रोकड असलेले पाकीट सापडत नसल्याने त्या मोठमोठ्याने रडत होत्या. हे समजल्यावर पोलीसपाटील अर्जुन काटकर यांनी चौकशी करत पाकीट शोधून दिले.
पुकळेवाडी येथील एक महिला शेतिमाल विकण्यासाठी कुकुडवाड येथे आल्या होत्या. गावात फिरून भाजीपाला विकत असताना त्यांच्याजवळ असणारे पैशाचे पाकीट कुठेतरी पडल्याचे जाणवले अन् त्यांच्या काळजात धस्स झाले. काटकसर करून संसारात जोडलेले दीड तोळे सोन्याचे दागिने व अडीच हजार रुपयांची रोकड या पाकिटात होती. पाकीट पडल्याचे लक्षात आल्यावर त्या मोठमोठ्याने रडायला लागल्या. गावभर फिरून रताळे व कोथिंबीर विकत असताना पडलेले पाकीट नेमके कुठे पडले व ते सापडेल की नाही, याचा विचार करत त्या गावात एके ठिकाणी रडत असल्याचे पोलीसपाटील स्वयंसेवक व शिवशक्ती कला, नाट्य, सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन काटकर यांच्या नजरेस पडले. काटकर यांनी त्या महिलेची विचारपूस करत शांत केले. अत्यंत जिद्दीने व कसून तब्बल दीड तास चौकशी करत काटकर यांनी या महिलेच्या पाकिटाचा तपास लावला. या पाकिटामध्ये असलेली रक्कम व दागिने याची खातरजमा करून ते त्या महिलेकडे सुपूर्त केले.