सातारा : लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यावर पोलिसांचा भर आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले आहे. मात्र पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत असून त्यांनीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा पोलीस कुटुंबीय तसेच नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजाराकडे पोहोचत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. संचारबंदी तसेच लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३८६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ३७६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या काही अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर आतापर्यंत ५ पोलीस कर्मचारी कोरोना उपचारादरम्यान दगावले आहेत. जिल्हा पोलीस दलात सध्या ३८३२ कर्मचारी कार्यरत असून त्यात २६३ अधिकारी आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस १४३ अधिकाऱ्यांनी व २४५३ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसेच दुसरा डोस ८५ अधिकाऱ्यांनी व १३७८ कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
कोट :
रात्री ड्युटी करून आल्यावर पप्पा थकलेले असतात. त्यामुळे ते दिवसभर घरात झोपतात. तसेच सायंकाळी पुन्हा ड्युटीवर जातात. त्यावेळी आम्हाला त्यांची खूप काळजी वाटते. रात्री आम्हाला घरी एकटेच राहावे लागते. त्यांनाही आराम करायला भेटला पाहिजे. दोन दोन तासाची ड्युटी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांना द्यायला हवी.
- प्रतीक नवघणे, सातारा
कोट :
माझी आई आणि वडील दोघेही पोलीस आहेत. त्यामुळे कधीकधी दोघेही घरी नसतात. सध्या कोरोनाच्या काळामध्ये मी घरी एकटाच असतो. आई-बाबा मला अधुनमधून फोन करतात, पण माझी काळजी काही वाटत नाही. पण मला त्यांची काळजी वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर, माझीच काळजी, चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
- प्रणव माने, गोळीबार मैदान, सातारा
कोट:
नागरिकांची सुरक्षा करणे पोलिसांची जबाबदारी आहेच. मात्र नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्यामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येतो. माझ्या वडिलांनी एकदा कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे पुन्हा तसे कोणतेही संकट येऊ नये असे आम्हाला वाटते.
- प्रिया जाधव, सातारा शहर पोलीस हेडकॉटर
कोट :
वडील ड्युटीवर जातात, त्यावेळी मी त्यांना मास्क, सॅनिटायझर देते. त्याचा वापर करण्यास सांगते. नागरिकांनीही ते वापरावे. वडील घरी नसताना मन उदास होते. तुम्ही घरी लवकर या, असा फोन करून मी त्यांच्याकडे वारंवार हट्ट धरते.
- साधना जाधव, सातारा
चौकट:
एकूण कोरोनाबाधित पोलीस ३८६
उपचार सुरू असलेले पोलीस ६९
कोरोना बाधित अधिकारी ६
मृत्यू ५
लसीकरण पहिला डोस अधिकारी १४३
लसीकरण पहिला डोस कर्मचारी २४५३
लसीकरण दुसरा डोस अधिकारी ८५
लसीकरण दुसरा डोस कर्मचारी १३७८
लसीकरण झालेल्या पोलिसांची संख्या ३८३१