लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : डेरा सच्चाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना न्यायालयाने सोमवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बाबा राम रहीम यांच्या पिंपरद, (ता. फलटण) येथील आश्रमाभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावासह तालुक्यात शांततेचे वातावरण आहे.बाबा राम रहीम आणि त्यांचे फलटण कनेक्शन जुने आहे. २००८ साली पिंपरद येथे सात एकर जागेत सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून आश्रम उभारण्यात आले. या आश्रमाचे काम हजारो भक्तांच्या श्रमदानातून अवघ्या तीनच दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. बाबांच्या देखरेखीखाली आश्रम उभारत असताना त्यांच्याबरोबर असलेला गाड्यांचा ताफा, रायफलधारी अंगरक्षक बघून सर्वांनाचा बाबांबद्दल मोठे कुतूहल वाटले होते.सर्वधर्मियांसाठी आश्रम बांधल्याचे आणि येथून प्रवचनाचे आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे बाबांनी सांगितल्याने त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. मात्र, काही कालावधीनंतर बाबा राम रहीम यांचे आश्रमात येणे पूर्णपणे बंद झाले. आश्रमातील बाग-बगीचा, शेती आणि देखभालीसाठी केवळ पाच ते सहा व्यक्ती या ठिकाणी कार्यरत होत्या. आश्रमात कधीतरी सत्संग असायचा. त्यामुळे पिंपरद गावालाही या आश्रमाबद्दल फारसे अप्रूप वाटत नव्हते.बाबा राम रहीम यांना अटक व शिक्षा झाल्यानंतरही पिंपरदससह फलटण तालुक्यात या घटनेचे कोणतेही पडसाद उमटले नाही. मात्र, परिसरातील अनेक अतिउत्साही नागरिक बाबांचे हे आश्रम आश्रम पाहण्यासाठी पिंपरद येथे गर्दी करू लागले आहेत. सोमवारी आश्रम पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांनी पिटाळून लावले. बाबा राम रहीम यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर या आश्रमाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव शेळके लक्ष ठेऊन आहेत.
पिंपरदमधील आश्रमाला पोलिसांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:41 PM