सातारा : प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेने गुरुवारी काढलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकातून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस करीत असताना घसरून पडल्याने सातारा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ जखमी झाले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, या झटापटीत शिवसेनेचे काही ज्येष्ठ कार्यकर्तेही घसरून पडले. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी भूमी अधिग्रहण कायद्याला शिवसेनेचा विरोध आहे. हा कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून, तो त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गुरुवारी साताऱ्यात मोर्चा काढला. प्रा. बानगुडे-पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख हर्षद ऊर्फ भानुप्रताप कदम, नंदकुमार घाडगे आणि शिवसेनेचे अन्य पदाधिकारी दोन बैलगाड्यांमधून मोर्चात सहभागी झाले होते. शिमग्याचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. प्रा. बानगुडे पाटील यांनी बैलगाडीत उभे राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, ‘शिवसेनेने कायमच शेतकऱ्यांच्या हिताची आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची भूमिका घेतली आहे. योग्य आणि भूमिपुत्रांच्या हिताचे जे असेल त्याला शिवसेना पाठिंबाच देईल; पण जे भूमिपुत्रांवर अन्याय करणारे असेल, त्याला शिवसेना कडाडून विरोध करेल. केंद्र शासनाचा भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. यातून फक्त उद्योगपती आणि धनदांडग्यांचे हित साधण्यात येईल. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना तिच्या कुशीतून हुसकावून लावण्याचा हा प्रयत्न शिवसेना सहन करणार नाही.’ यावेळी प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात लहानमोठे ३४ प्रकल्प प्रस्तावित आहेत. परंतु प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे पुनर्वसन, रोजगार, नागरी सुविधा हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांची सोडवणूक करून विस्थापितांना न्याय मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पूर्वीच्या भूमी अधिग्रहण कायद्यातील त्रुटी दूर व्हायला हव्या होत्या. ते दूरच राहिले; उलट शेतकऱ्यांच्या जमिनीवरून गाढवाचा नांगर फिरवण्याचे पाप या प्रस्तावित कायद्याद्वारे होत आहे.’ नरेंद्र पाटील, संजय मोहिते, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, प्रदीप माने, शारदा जाधव, संभाजी जगताप, रणजित भोसले, दशरथ चांगण, अनिल सुभेदार, दिनश बर्गे, यशवंत घाडगे, प्रताप जाधव हे आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सेनेचा मोर्चा रोखताना पोलीस निरीक्षक जखमी
By admin | Published: March 06, 2015 12:31 AM