खंडाळा : जालना येथून बेपत्ता झालेले लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे तेरा दिवसानंतर खंडाळा येथे महामार्गाच्या कडेला आढळून आले. खंडाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जालनापोलिसांकडे सुपूर्त केले. बेपत्ता अधिकाऱ्याचा शोध लागल्याने कुटुंबियांसह पोलिसांचा जीव भांड्यांत पडला. पोलीस निरिक्षक संग्राम ताटे हे रविवार, दि. ३ रोजी खंडाळा येथील जुना टोलनाका परिसरात चक्कर येऊन पडलेल्या अवस्थेत होते. महामार्गालगतच्या एका हॉटेल कामगाराने त्यांना उठवून बसविले. त्यानंतर त्यांनी कामगाराच्या फोनवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी खंडाळा येथील स्थानिक मित्रांना फोन करून कल्पना दिली. दरम्यान, खंडाळ्याचे पोलीस निरिक्षक महेश इंगळे यांनी संग्राम ताटे यांना ताब्यात घेतले.
सायंकाळी त्यांचे नातेवाईक खंडाळ्यात पोहचले. तसेच जालना येथील कदीम पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाप हे सुद्धा पोहचले. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी त्यांना जालना पोलिसांकडे सुखरुप सुपूर्त केले. संग्राम ताटे हे तेरा दिवसांपूर्वी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते सांगली येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यामुळे सांगली पोलीसही त्यांचा शोध घेत होते. अखेर ते खंडाळ्यात आढळून आले. सलग तेरा दिवस चालत राहिलेसंग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले. कोणता तरी मानसिक दबाव असल्यासारखे ते दिसून येत होते. सततच्या चालण्याने त्यांच्या पायाला जखमाही झाल्या होत्या. खंडाळ्यातील स्थानिक लोकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची विनंती केली पण त्यांनी ती नाकारली.